ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दिल्ली सरकारमधील माजी मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांना तिहार जेलमध्ये व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत आहे. जेलमध्ये एकजण त्यांची मसाज करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर जेल प्रशासनाच्या कारभारावर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात सत्येंद्र जैन यांना 30 मे रोजी ईडीने ताब्यात घेतलं होतं. याप्रकरणात सध्या ते तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी जैन यांचा जेलमधील एक व्हिडिओ ट्विटवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये जैन यांची जेलमध्ये आरामात मालिश सुरू असल्याचे दिसते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर जेल प्रशासनावर आक्षेप घेतले जात आहेत. जेल अधीक्षक यांच्यासह चार कर्मचाऱ्यांवर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, 35 हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या डय़ूटीचं ठिकाण बदलण्यात आलं आहे. ईडीने याप्रकरणी कोर्टातही तक्रार दाखल केली आहे.
अधिक वाचा : कव्वालीच्या कार्यक्रमात खा. इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण
यावर बोलताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले, सत्येंद्र जैन आजारी असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते फिजिओथेरपी घेत आहेत. जैन यांच्या आजाराची अशाप्रकारे खिल्ली उडवणे कितपत योग्य आहे? हे भाजपने ठरवावे. तसेच जेलमधील व्हिडिओ लीक होऊन भाजपपर्यंत पोहोचलाच कसा?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.