साधू मारहाण प्रकरणी सहा जणांना अटक, भाजपने केला निषेध
जत/प्रतिनिधी
उत्तरप्रदेश राज्यातील मथुरेच्या चार साधूना मुले पळवणारी टोळी समजून गंभीर मारहाण केल्याप्रकरणी राज्याच्या गृहविभागाकडून चांगलीच दखल घेण्यात आली असून लवंगा सरपंचासह दहा ते बारा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सहा जणांना तातडीने अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणी माजी आमदार तथा भाजप नेते विलासराव जगताप यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. या घटनेच्या मुळाशी जाऊन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलिस अधीक्षक मनिषा डुबूल, उपाधीक्षक रत्नाकर नवले व पोलिस महासंचालकाचे पथकांनी भेट दिली आहे. या घटनेनंतर जत तालुक्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी सरपंच आमसिद्ध तुकाराम सलगर, लहू लोखंडे, मुत्तप्पा वडीयार, आप्पा पवार, भाऊसाहेब शिंदे, खंडू टिळे, यांच्यासह पंचवीस लोकांवर उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली. यापैकी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिस व घटनास्थळी मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी उत्तरप्रदेश मधील मथुरेतील साधू संथ जत तालुक्यातील लवंगा गावातून कर्नाटक विजापूर येथे दर्शनासाठी निघाले होते. रस्ता विचारण्यासाठी साधूंनी लवंगा येथे लहान शाळकरी मुलाकडे चौकशी केली. तेथील काही ग्रामस्थांना हे साधू बहरूपी असून लहान मुलांना पळवणारी टोळी आहे, असा गैरसमज करून घेऊन त्यांना पट्टा, काठीने बेदम मारहाण केली.
हे ही वाचा : खातरजमा न करता उत्तर प्रदेशच्या साधूंना गाडीतून ओढून काठीने ,पट्ट्याने मारहाण ; वारकरी संप्रदाय नाराज
दरम्यान, काही नागरिकांनी मारहाणीचा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला. यानंतर ग्रामस्थांनी उमदी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी त्या साधूना ताब्यात घेत त्यांच्याकडे व मथुरेतील मठामध्ये त्यांची चौकशी केली असता साधू देव दर्शनासाठी विजापूरच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी देखील साधूना तक्रार दाखल करण्याची विचारणा केली. मात्र, त्यांनी दर्शनासाठी जायचे असल्याने तक्रार देण्यास नकार दिला.
दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले असून गृह विभागाने देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पोलिस महासंचालकाचे पथक व खूद्द पोलिस अधीक्षक गेडाम यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेची कसून चौकशी केली आहे. यामध्ये सरपंचासह पंचवीस लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मारहाणीची घटना गैरसमजुतीतून
लवंगा गावातील घटना प्रथमदर्शनी मुल पळवणारी टोळी असल्याच्या गैरसमजुतीतून झाल्याचे दिसून येते. पुढील तपासात सत्य समोर येईल. मात्र, ज्या लोकांनी कायदा हातात घेतला आहे. त्यांच्या वर कायदेशीर कारवाई केली आहे. संशयास्पद असेल तर पोलिसांशी संपर्क साधा. कायदा हातात घेऊ नये. साधूंशी संपर्क साधला असता त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे.- दीक्षित गेडाम, पोलिस अधीक्षक, सांगली
महाराष्ट्र ही साधू संताची भूमी आहे. या राज्यात साधू संताना नेहमीच आदराचे स्थान देण्यात आले आहे. परंतु लवंगा या ठिकाणी घडलेली घटना खूपच निंदनीय आणि निषेधार्ह आहे. जत तालुका हा सांप्रदायाला मानणारा तालुका आहे . या तालुक्यात काल उत्तर प्रदेश मधील ज्या साधुसंतांना गैरसमजुती मधून मारहाण करण्यात आली या घटनेचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. वास्तविक ज्यांनी या साधू संतांना मारहाण केली असे लोक गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत, त्यांच्यावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत . पोलिसांनी या घटनेची निपक्ष चौकशी करून संबंधितावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी अशी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे.- विलासराव जगताप, माजी आमदार जत.